राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध संशोधन करुन विविध वाण विकसीत केलेले आहेत. या बियाणांच्या प्रचार, प्रसारासाठी २०१९ च्या रब्बी हंगामात एकूण ४५ खासगी बीज कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांमजस्य करार केलेले आहेत. खरीप हंगाम २०२० मध्ये एकूण ११५ खाजगी कंपन्यानी व शेतकरी बिजोत्पादक कंपन्यांनी विद्यापीठाशी करार केला आहे.
विद्यापीठाचे कांदा फुले समर्थ, सोयाबीन फुले संगम आणि फुले किमया, हरभरा मध्ये फुले विक्रम आणि फुले विक्रांत, रब्बी ज्वारीमध्ये वसुधा, सुचित्रा आणि अनुराधा, गहु पिकामध्ये समाधान, त्रिंबक हे वाण शेतक-यांमध्ये लोकप्रिय आलेले आहेत. विद्यापीठाचे गुणवत्तापूर्ण बियाणे शेतक-यापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रसार व्हावा, याकरिता या वाणांचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. या वाणांचे बिजोत्पादन साखळीनुसार विविध स्तराचे बियाणाची खाजगी बीज कंपन्या, शेतकरी बिजोत्पादक कंपन्या मागणी करीत असतात.
महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांनी सयुंक्तरित्या मुलभूत व पायाभूत बियाणे वितरण करणेसाठी कंपन्यासोबत सांमजस्य करार करणेबाबत धोरण निश्चीत केलेले आहे. त्यानुसार खासगी बीज कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्यानी सांमजस्य करार केलेले आहेत. करारानुसार सदर कंपनीला तीन वर्षापर्यंत करारात नमुद केलेल्या पिकांच्या वाणांचे बियाणे खरेदी करता येईल.
याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन शरद गडाख, आनंद सोळंके, विनय जोशी, पंडीत खर्डे उपस्थित होते.