लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नऊ महिने खस्ता खाऊन पोटात वाढवलेल्या बाळाला जन्म देण्यापासून त्याला लहानाचे मोठे करण्यात महिला आघाडीवर असतातच, परंतु पुढे कुटुंब नियोजनाचा ठेकाही महिलांनाच घ्यावा लागतो. संसार दोघांचा असूनही कुटुंब नियोजनात पुरूषाचा वाटा नसल्यासारखा आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत महिलांनी २६ हजार १०३ शस्त्रक्रिया केल्या. त्या तुलनेत पुरूषांनी केलेल्या नसबंदीची संख्या केवळ ५० आहे.
लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच कुटुंब नियोजनासाठी देशात, राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात येतो. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला लोकसंख्यानिहाय कुटुंब शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले जाते. कुटुंब नियोजनासाठी स्त्रीयांबरोबर पुरूषांनाही शस्त्रक्रिया करता येतात. परंतु पुरूषी अहंकार किंवा वेगवेगळ्या गैरसमजामुळे पुरूष शस्त्रक्रिया करून घेण्यास पुढे येत नाहीत. नगर जिल्ह्यात महिलांच्या तुलनेत पुरूषांचे शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण अर्धा टक्काही नाही.
जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागाला २०१९-२० या आर्थिक वर्षात २४ हजार ७१९ कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्या वर्षी एकूण १९ हजार २४९ शस्त्रक्रिया झाल्या. त्यात १९ हजार २१५ शस्त्रक्रिया महिलांच्या, तर केवळ ३४ शस्त्रक्रिया पुरूषांच्या होत्या. त्यावर्षी ७८ टक्के उद्दिष्ट आरोग्य विभागाने पूर्ण केले.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातही आरोग्य विभागाला तेवढेच म्हणजे २४ हजार ७१९ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट मिळाले. परंतु हे वर्ष कोरोनात गेल्याने शासकीय शस्त्रक्रिया सहा महिने बंदच होत्या. त्यामुळे जानेवारी २०२१पर्यंत एकूण ६९०४ शस्त्रक्रिया झाल्या. त्यात ६ हजार ८८८ महिलांच्या, तर केवळ १६ शस्त्रक्रिया पुरूषांनी केल्या. जानेवारीपर्यंत हे उद्दिष्ट २८ टक्के झाले आहे.
म्हणजे एकूण २६ हजार १५३ शस्त्रक्रियांपैकी केवळ ५० शस्त्रक्रिया पुरूषांनी केल्या आहेत. संसाराचा गाडा ओढताना कुटुंबात प्रत्येक ठिकाणी महिला पुढे असते. कुटुंबात पाळणा हलवण्याची जबाबदारी ती पार पाडतेच. परंतु पुरूषी अहंकारामुळे पाळणा लांबवण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते हे या आकडेवारीवरून पुढे आले आहे.
----------
हे आहेत गैरसमज
नसबंदी शस्त्रक्रियेने आपण कमजोर होऊ, पौरूषत्व कमी होते, असे अनेक गैरसमज पुरूषांमध्ये आहेत. परंतु असे कोणतेही परिणाम होत नाहीत. उलट शासनाने यावर प्रबोधन कार्यक्रम राबविला आहे. नसबंदी केल्यास पुरूषाला १४५१ रूपये प्रोत्साहन भत्ता मिळतो, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
----------
एक नजर शस्त्रक्रियांवर...
वर्ष २०१९-२०
एकूण - १९२४९
महिला - १९२१५
पुरूष- ३४
------------
वर्ष २०२०-२१ (जानेवारीपर्यंत)
एकूण ६९०४
महिला ६८८८
पुरूष- १६
--------
फोटो - १० फॅमिली प्लॅनिंग