अहमदनगर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात पहिली ते चौथीच्या शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर श्रेणी ऐवजी वर्गोन्नत असा उल्लेख राहणार आहे.
कोरोनामुळे प्रारंभी सर्व शाळा बंद होत्या. परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२० पासून काहीशी परिस्थिती निवळल्यानंतर प्रारंभी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरू करण्यात आले. मात्र पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा वर्षभर बंद होत्या. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने, आहे त्या शाळाही बंद कराव्या लागल्या. पुढे शासनाने पहिली ते अकरावी पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, दरवर्षी विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक तयार करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर त्याचे गुण, श्रेणी, उंची, वजन, उपस्थिती अशा बाबी नमूद करत असत. मात्र यंदा शाळा भरली नसल्याने आणि परीक्षाही होणार नसल्याने शासनाने पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे शिक्षक असा उल्लेख करून ही प्रगतीपत्रक तयार करणार आहेत.
-----------
पहिलीतील विद्यार्थी - ६८,७१६
दुसरीतील विद्यार्थी - ७४,८९६
तिसरीतील विद्यार्थी - ७८,४५१
चौथीतील विद्यार्थी - ८०,४४९
-------------
प्रगतीपत्रकच बदलणार
प्रगतीपत्रकावर यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवस, उंची, वजन, तसेच गुणवत्तानिहाय श्रेणी हा उल्लेख असायचा. परंतु आता असा उल्लेख असणार नाही. प्रगतीपत्रकावर केवळ वर्गोन्नत असा उल्लेख असेल.
--------------
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा गेल्या वर्षभरापासून सुरू झालीच नाही. कोरोनाची स्थिती असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे त्यांच्या प्रगतीपत्रकावर वर्गोन्नत असा उल्लेख असणार आहे.
- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी प्राथमिक
----------
कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने मित्रांसोबत मैदानावर खेळण्याचा आनंद मिळत नाही.
सध्या मोबाईल हेच शिक्षणाचे माध्यम झाले आहे.
घरी बसून वेळ घालवणे कठीण झाले आहे. तरीही चित्रकला, कागदकाम, हस्ताक्षर सुधारणा, रांगोळी आदी कलेची जोपासना चालू आहे.
-सर्वज्ञ बनसोडे, डी.डी. काचोळे विद्यालय, श्रीरामपूर
------------
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी आमच्या शिक्षकांनी दररोज आमचे गुगल मीटवर उत्कृष्टपणे ऑनलाईन क्लास घेतले. तसेच नेहमी घरी येऊन अभ्यास तपासून वैयक्तिक मार्गदर्शन केले. वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या दारी,टिलिमिली कार्यक्रम, दीक्षा ॲपवरून अभ्यासमाला असे अनेक उपक्रम आनंददायी पद्धतीने राबवून आमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे आनंददायी शिक्षण मिळाले.
- रामेश्वर महादेव गिते, इयता ४
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी, ता. पाथर्डी
--------------
लॉकडाऊन असल्यामुळे शाळा बंद होत्या. या काळात सकाळी ७.४५ ते ९ यावेळेत आमचा १ ली चा वर्ग आमच्या वर्ग शिक्षिका ऑनलाईन घ्यायच्या. त्यानंतर १ तास व संध्याकाळी १ तास माझी आई माझा अभ्यास घ्यायची. तसेच दुपारच्या वेळी चित्रकला, कार्यानुभवचा सराव करून घ्यायची. दररोज संध्याकाळी देवासमोर शुभंकरोती, रामरक्षा, मारुती स्तोत्र, अशा विविध प्रार्थना म्हणायचे. परीक्षा न देता दुसरीच्या वर्गात गेल्यामुळे आनंद झाला आहे. परंतु परीक्षा ऑनलाईन का होईना व्हायला हव्या होत्या.
- सौम्या संदीप खरमाळे, इयत्ता दुसरी,
---
नेट फोटो- डमी
एक्झाम
०४ पास सर्टिफिकेट