पारा ४३ अंशापार
By admin | Published: April 18, 2017 5:19 PM
सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला.
अहमदनगर : सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला. श्रीरामपूरमध्ये या उन्हाळ्यातील ४३ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवर तापमापकातील पारा पोहोचला होता.गेल्या वर्षी चांगला पाऊस झालेला असला तरी यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत आहे. दिवसेंदिवस पडणारे कडाक्याचे ऊन व सातत्याने वाढणारी प्रचंड उष्णता यामुळे वातावरण भलतेच तापले आहे. रखरखत्या उन्हाने जमीन कमालीची तापून चटके बसू लागले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूर्यनारायण कोपू लागल्याने सर्वत्र उन्हाच्या झळा बसत आहेत. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने अंगाची काहिली असह्य होत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अंगात पांढºया रंगाचे सुती वस्त्र, डोक्यावर टोपी, उपरणे, डोळ्यावर काळे गॉगल लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उन्हात बचाव करणाºया या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या तापमापकावर या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवार व सोमवारीदेखील श्रीरामपूरच्या मेनरोडवर ४३ अंश सेल्सिअस तापमान पोहोचले होते. मंगळवारी दुपारनंतर उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर थोडा खाली घसरला. श्रीगोंदा शहरात ४० अंश तर श्रीगोंदा कारखाना कार्यस्थळावर ४१ अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला होता. राहुरीतही मंगळवारी ४२ अंश सेल्सिअसवरच पारा घुटमळत होता. त्यामुळे खंडेरायाच्या यात्रेतील गर्दीवरदेखील परिणाम जाणवत होता. दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री उशिरापर्यंत यात्रेत गर्दी होत आहे. ..................................उष्म्याने जीव झाला कासावीसशीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. मंगळवारी दुपारी २ वाजता कोपरगाव शहर व तालुक्यात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या महिनाभरातील हे सर्वोच्च तापमान गणले गेले आहे. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे. मात्र आताच कोपरगावकरांचा जीव उष्म्याने कासावीस होऊ लागल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.