घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव व परिसरात गत दहा दिवसात भूकंपाचे तीन धक्के जाणवले. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेचे शास्त्रज्ञ व आपत्ती व्यवस्थापन पथक रविवारी घारगावात दाखल झाले नागरिकांच्या मनातील भीती दूर करीत त्यांना घाबरू नये, असे आवाहन पथकाने केले.संगमनेर तालुक्यात पुण्याकडे जाताना नाशिक - पुणे महामार्गालगत डोंगराळ परिसर आहे. त्याला पठार भाग म्हणून ओळखले जाते. या भागात गत दहा दिवसात घारगाव, माहुली, नांदूर खंदरमाळ, बोरबन, कोठे, अकलापूर आदि भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. पथकात मेरीच्या वैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी, कनिष्ठ भूवैद्यानिक अजिंक्य काटकर, सहाय्यक संशोधक कैलास गिराम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे डॉ.वीरेंद्र बडदे, तहसीलदार साहेबराव सोनावणे आदि उपस्थित होते.चारुलता चौधरी म्हणाल्या, घारगाव परिसारत काही दिवसांपासून जमिनीला हादरे बसत आहेत हे भूकंपाचे हादरे असून त्याची तीव्रता खूपच कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांना भूकंपापूर्वी घ्यावयाची काळजी भुकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करायचे याची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, खंदरमाळच्या सरपंच वैशाली डोके, उपसरपंच प्रमोद लेंडे, घारगाव उपसरपंच राजेंद्र कान्होरे, बोरबनचे सरपंच संदेश गाडेकर, संदीप आहेर, सुरेश आहेर, किशोर डोके आदि उपस्थित होते.