श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यात १४० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित पोलिसांनाही म्हाडाच्या प्रकल्पात घरे मिळावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.शहरातील म्हाडामधील सदनिका सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध क रून द्याव्यात, यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे पाठपुरावा केल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. सरकारी योजनांचा लाभ शहरवासीयांना मिळावी यासाठी आग्रही आहोत असे ते म्हणाले.शहरातील म्हाडा प्रकल्पातील सदनिकांचे पोलीस कर्मचा-यांना हस्तातंरित करण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार लोखंडे बोलत होते. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक अरुण जगताप, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकारी सुमंत मोरे, तहसीलदार सुभाष दळवी, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.शहर व तालुका पोलीस ठाण्यात १४० पोलीस कर्मचारी काम करतात. उर्वरित पोलिसांसाठीदेखील लवकरात लवकर सदनिका मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करणार आहोत. सरकारी योजनांचा लाभ त्यांना दिला जावा. मात्र, प्रकल्प व लाभार्थी दोघेही सरकारी सेवेशी असल्याने सदनिकांचे दर कमी असावेत अशी मागणी मंत्री मेहता यांना प्रत्यक्ष भेटून केल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले. नगरपालिका तसेच महावितरण येथे पायाभूत सुविधा पुरवणार आहे. त्यामुळे पोलिसांचा कामांतील उत्साह आणखी वाढीस लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्षा आदिक यांनी म्हाडामुळे शहराच्या वैभवात भर पडल्याने समाधानी असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रशस्त असा हा प्रकल्प असून पालिका नागरी सुविधा देण्यास क टिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, संतोष काबळे, मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे, अभियंता जी.जी.सोनार आदी उपस्थित होते.
अद्ययावत सुविधा
पोलीस अधीक्षकांच्या नावे प्रकल्पातील ८० सदनिका खरेदी करण्यात आल्या आहेत. पोलीस कर्मचारी वसाहत म्हणून त्यांचा वापर केला जाणार आहे. यातील ७८ सदनिका या मध्यम उत्पन्न गटासाठी (७०० चौरस फूट) व अन्य दोन कमी उत्पन्न गटासाठी (५०० चौरस फूट) आहेत. पोलिसांसाठी स्वतंत्र इमारतीत ही निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. फ्री फॅब तंत्रज्ञान या प्रकल्पात राबविण्यात आले आहे. मलशुद्धीकरण, बगीचा, पेव्हिंग ब्लॉक व इतर सुविधा येथे प्रदान करण्यात आल्या आहेत.