अहमदनगर : नगर तालुक्याला तीन आमदार आहेत. पण लक्ष कोणीच देत नाही. ही नगर तालुक्याच्या जनतेची ओरड आहे. यापुढे नगर तालुक्याला कोणाच्या दारात जावे लागणार नाही. नगर तालुक्याला आमदार आणि खासदार मीच राहणार आहे. साकळाईबाबत मनात संशय ठेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच या योजनेच्या भूमिपूजनासाठी आणणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील एका कार्यक्रमात विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, अनिता हराळ, बाळासाहेब हराळ, संजय कोतकर, पल्लवी कुताळ, प्रवीण कोकाटे, प्रवीण कोठुळे, रवींद्र भापकर, संजय गिरवले, दत्ता नारळे, राजाराम भापकर गुरुजी उपस्थित होते. साकळाई योजनेचा वापर फक्त राजकारणासाठी करण्यात आला आहे. काहींनी २० वर्षे यावर राजकारण करीत निवडणुका लढवल्या. रस्त्यावर बसून किंवा आंदोलन करून साकळाईचा प्रश्न सुटणार नाही. साकळाईचा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी परत तुमच्याकडे मते मागायला येणार नाही असे आश्वासन विखे यांनी दिले.विखे कुटुंबाला राजकारणातून संपविण्याचा काहींनी प्रयत्न केला. सुजय खासदार झाला तर आपल्याला त्याच्या दारात जावे लागेल म्हणून मला विरोध झाला. पण ज्यांनी विखे कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला आज त्यांची अवस्था पहा. त्यांच्या पक्षात माणसे राहिली नाहीत. राज्याचे वाटोळे कोणी केले असेल तर ते फक्त राष्ट्रवादीने केले. कोट्यवधीचे घोटाळे केले. आता येत्या तीन महिन्यात त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर केली. देखण्या माणसाला फक्त पहायला जा च्अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाईबाबत केलेल्या आंदोलनाचा धागा पकडत डॉ विखे म्हणाले, देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जात जा. पण साकळाई फक्त सुजय विखेच करू शकतो. अन्य कोणाचे ते काम नाही, अशा शब्दात त्यांनी सय्यद यांचे नाव न घेता टीकास्र सोडले.
'मीच नगरचा खासदार अन् आमदार; कुणाच्या दारात जायची गरज नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:43 AM