माया हापसेब्राह्मणी : खोडकीडा वगळता अन्य रोग व अळी माहीत नसलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील मका, चारा पिकांवर लष्करी अळीचा अॅटॅक झाल्याने मका उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.दुष्काळी परिस्थितीत पशुपालन वाचविण्यासाठी कमी पाण्यात व अल्पावधीत येणारे चारा पीक म्हणून मकाचे उत्पादन अधिक प्रमाणात होत आहे. यापूर्वी मका पिकांवर खोडकीडा वगळता अन्य रोग व अळी पडल्याचे कधी इतिहासात दिसून आले नाही. मात्र, कपाशीवरील बोंडअळी अन् उसावरील हुमणीअळी पाठोपाठ आता ऐन दुष्काळात मका, चारा पिकावर स्पोडपटेरा अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी आर्थिक झळ बसत आहे. मका हे कमी खर्चातील पीक असल्याने सर्वसामान्य शेतकºयांनी यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे चारा पिकांचे पैसे होईल. या उद्देशाने ऊस तोडून मकाला प्राधान्यक्रम दिला. मात्र,कधी नव्हे ते अचानक आलेल्या स्पोडपटेरा अळीने मका उत्पादक शेतकºयांची झोपच उडाली आहे. अळीचा प्रादुर्भाव इतका भयानक आहे, की दोन-तीन वेळा औषध फवारणी करूनही अळी आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत येत आहे. एवढे करूनही समाधानकारक पीक आणूनही पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी सुधारण्याऐवजी आणखी डबघाईस आल्यास नवल वाटायला नको, हे निश्चित.भविष्यातील चारा टंचाईला सामोरे जाण्यासाठी मुरघास या आधुनिक पद्धतीने चारा निर्मितीसाठी मका पिकांना यंदा अच्छे दिन आले असतानाच लष्करी अळीने थैमान घातल्याने ब्राह्मणीसह राहुरी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मकाचे पीक धोक्यात सापडले आहे. दरवेळी सर्व बाजूंनी अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी आता कृषी विभाग व सरकारनेच आधार द्यावा.दक्षिण भारतात यापूर्वी खरिपात आलेली लष्करी अळी आपल्या परिसरात यंदा प्रथमच रब्बीत आली आहे. ती गत आठवड्यापासून अधिक दिसून येते. वाढीदरम्यान मका पिकाच्या पोग्यावर प्रथम अंश दिसतो. तत्काळ लक्ष न दिल्यास परिणामी प्रमाण वाढते. अळी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस प्रति लिटर २ मिली प्रथम फवारणी करावी. प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास कोराजनची फवारणी करावी. - शिवप्रसाद कोहकडे, कृषी सहाय्यक, ब्राह्मणी.नांगरट, रोटा मारून लहान ट्रॅक्टरद्वारे अर्धा एकर मका पेरणी केली. मशागत, बियाणे, दोनदा औषध फवारणी केली. एकूण खर्च सात हजार रुपये झाला. मात्र,अळी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे पीक वाया गेले आहे. -बापूसाहेब काशिनाथ हापसे, नुकसानग्रस्त शेतकरी, ब्राह्मणी.