कर्जत : दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर घेऊन जाणारे वाहन कर्जत पोलिसांनी खेड शिवारात पकडले. यावेळी दोघांसह सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खेड गावाच्या दिशेने एक कार येत असून, त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार महादेव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गणेश भागडे, महिला होमगार्ड कल्पना घोडके यांच्या पथकास कारवाईस पाठविले. खेड गावच्या शिवारात पोलिसांच्या पथकाने कार (क्र. एमएच १४ बीके २७७२) थांबविली. आसीफ गफूर शेख (वय २२), अरबाज हसन शेख (वय २२, रा. मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या २५ किलो वजनाच्या ८ गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत ३ हजार ५०० रुपये, असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला. ही पावडर घेऊन ते दूरगावला चालले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. दोघांविरोधात कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते करीत आहेत. दूध पावडर आणि कार असा ४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.