कर्जत : दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतक-यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दूध उत्पादकांचा मेळावा कर्जत येथील सदगुरू मिल्क अॅन्ड मिल्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दूध उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत हे होते. यावेळी संयोजक शंकरराव नेवसे, उध्दवराव नेवसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कल्याणी नेवसे, अशोक खेडकर, काका धांडे, सचिन कातोरे, डॉ.कांचन खेत्रे, बी. बी. बो-हाडे, बापूसाहेब नेटके, अमृत लिंगडे, लहु शिंदे, प्रशांत बुध्दिवंत, रामदास हजारे, राम ढेरे, रवींद्र थोरात, राहुल सोनमाळी यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका होता. येथे शेतीला पूरक म्हणून दूध धंद्याची गरज होती हे ओळखून शंकर नेवसे व त्यांचे बंधू उध्दव नेवसे यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. ४०० लीटरवरील व्यवसाय आज ७० हजार लिटर केला आहे. ही एक क्रांती आहे, असे ते म्हणाले.यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर उध्दवराव नेवसे, शंकरराव नेवसे यांची भाषणे झाली. दूध उत्पादकांच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री आणि अॅडव्हान्स
पालकमंत्री प्रा राम शिंदे म्हणाले, राजकारणामध्ये येण्याअगोदर मी दुधाची डेअरी पण टाकली होती. दूध डेअरी सुरू करताना शेतक-यांनी दूध घालावे यासाठी त्यांना अॅडव्हान्स द्यावा लागतो. त्याप्रमाणे मी अॅडव्हान्स दिला होता. मात्र कालांतराने राम शिंदे यांची दूध डेअरी बंद पडली आणि शेतक-यांना दिलेला अॅडव्हान्स आजतागायत अनेक वेळा मागणी करूनही परत मिळाला नाही, हे सांगताच जोरदार हशा झाला.