अकोले : गटारी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारुविक्री होते़ या दिवशी दारू पिऊ नये, हा संदेश देण्यासाठी अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी (दि़१४) संध्याकाळी जाहीर दूध विक्री करणारे केंद्र उभारून दारुविक्री विरोधात गांधीगिरी करण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. गटारी अमावस्या ही १४ आॅगस्टला आल्याने स्वातंत्र्यदिनाची पूर्वसंध्या दारु पिऊन कलंकीत करू नये, द दारूचा नव्हे तर द दुधाचा अशी नवी बाराखडी आता आचरणात आणावी यासाठी हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे़ अकोले, राजूर, श्रीगोंदा, राहुरी, शेवगाव, संगमनेर, अहमदनगर, पारनेर अशा अनेक ठिकाणी ही जाहीर दूध विक्री होणार आहे.सध्या १५ रुपये ग्लास असलेल्या दुधाची किंमत शुक्रवारी फक्त ५ रुपये ग्लास ठेवण्यात येणार असून १०० ते २०० लीटर दूध प्रतीकात्मकरित्या विकण्यात येणार असल्याचे आंदोलनाचे सचिव बाळासाहेब मालुंजकर यांनी सांगितले. या दिवशी मांसाहार करण्याला कोणताही धार्मिक आधार नाही तेव्हा मांसाहार करून मुक्या जनावरांचे जीव घेऊ नये, अशीही विनंती आंदोलनाच्या वतीने करण्यात येणार आहे़ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन त्या दिनाचे पावित्र्य नष्ट न करता उलट दारुमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन आंदोलनाच्या जिल्हा अध्यक्षा रंजना गवांदे व हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)
गटारी अमावस्येला विकणार दूध
By admin | Published: August 13, 2015 11:04 PM