सध्या गणेशोत्सव सुरू असून अगामी काळात दसरा, दिवाळी हे सण आहेत. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी केली जाते. गेल्या काही दिवसांत गॅस, खाद्यतेल, तूप, सुकामेवा, तसेच मिठाई तयार करण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंच्या किमती वाढल्याने मिठाईचे दरही काही प्रमाणात वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध सध्या काही प्रमाणात शिथिल आहेत. त्यामुळे घरोघरी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उकडीचे माेदक, पेढे, लाडू, जिलेबी, बर्फी, बालुशाही, सुकाजाम, श्रीखंड आदी स्वरूपातील मिठाईला सध्या मोठी मागणी आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र जेरीस आले आहेत.
---------------
भेसळीकडे लक्ष असू द्या!
उत्सवाच्या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने भेसळ होण्याची शक्यता असते. कमी दर्जाच्या अथवा मुदतबाह्य झालेल्या पदार्थांचा वापर करून मिठाई तयार करण्याचे प्रकार नगर शहरात याआधीही समोर आले आहेत. त्यामुळे मिठाई खात्रीशीर ठिकाणीच खरेदी करणे महत्त्वाचे ठरते.
---------------------
का वाढले दर?
अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतात सुकामेव्याची आयात मंदावली आहे. मिठाई तयार करताना सुकामेवा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तसेच वाहतूक खर्च, मजुरी, गॅस दरवाढ आदीमुळे मिठाईचेही दर वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
---------------------
ग्राहक काय म्हणतात...
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, भाऊबीज, नाताळ आदी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. दिवसेंदिवस मात्र मिठाईचे दर वाढत आहेत. हे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे या दरांवर शासनाचे नियंत्रण असावे.
- संतोष आहेर, ग्राहक
-------------------
सणासुदीच्या काळात तसेच इतर वेळीही मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते. अशावेळी भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अन्न, औषध प्रशासनाने मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
- अभय म्हस्के, ग्राहक