अहमदनगर : विविध स्तरावरील क्रीडास्पर्धेत सहभागी आणि प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण देण्यात येतात. मात्र हे गुण देताना सरकारने एक अट घातली आहे. या अटीमुळे दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी सवलतीच्या गुणापासून वंचित राहतात. त्यामुळे ही अट रद्द करून सरसकट सवलतीचे गुण देण्याची मागणी होत आहे. यंदा तर कोरोनामुळे स्पर्धाच न झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर संक्रांत आली आहे.
सहावी ते दहावी आणि सहावी ते बारावी दरम्यान जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थी खेळला असल्यास दहावी, बारावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण मिळतात. हे गुण मिळण्यासाठी खेळाडूंना १० वी आणि १२ वीच्या वर्गात शिकत असताना स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अट आहे. जर १० वी अथवा १२ वीच्या वर्गात असताना स्पर्धेमध्ये सहभागी न झाल्यास त्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाहीत. सहावी, सातवी, आठवी आणि अकरावीत स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवले असले तरी गुण मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
जिल्हास्तरावरील प्रावीण्यास ५, विभागस्तर सहभागास ५ तर प्रावीण्यास १०, राज्यस्तर सहभाग १० व १२ प्रावीण्यास १५, राष्ट्रीयस्तर सहभाग १५ तर प्रावीण्य २० तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागास २० तर प्रावीण्यास २५ गुण दिले जातात.
...............
विनाअट गुण द्यावेत
ही अट शिथिल करून विनाअट गुण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, शारीरिक शिक्षण महामंडळ, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे. मात्र या मागणीवर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
….……………..
यंदा कोरोनामुळे यांना मिळणार गुण
कोरोनामुळे या वर्षी कोणत्याही स्पर्धा पार पडल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षी इयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यांनाच सवलतीचे गुण दिले जाणार आहेत.
….…………
कोट -
विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतल्यापासून विविध क्रीडाप्रकारात नैपुण्य मिळवत असतो. सवलतीचे गुण मिळवण्यासाठी दहावी व बारावीच्या वर्गात असताना स्पर्धेत सहभागाची अट आहे. सहभाग नसल्यास हे गुण मिळत नाहीत. ही अट अन्यायकारक आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासामुळे दहावी, बारावीत असताना खेळांच्या स्पर्धेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे सरकारने ही अटक रद्द करून सरसकट गुण द्यावेत.
- राजेंद्र कोतकर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ
….………………………………