अहमदनगर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या नगर तालुक्यातील अनेक प्रस्थापितांच्या समोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे. आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वर्षानुवर्षांची गावातील त्यांची मनसबदारी प्रथमच धोक्यात आली आहे.
नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांची गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. मात्र, प्रथमच त्यांच्या सत्तेला गावात मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनीच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या समोरही गेल्या ३० वर्षांपासूनच्या सत्तेला आव्हान मिळाले आहे. पवार यांच्या अधिपत्याखालीच आतापर्यंत या गावात बिनविरोधची परंपरा होती. आता गावातील काहींनी त्यांचे वर्चस्व झुगारत आघाडी तयार केली आहे.
माजी खासदार व दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या खारेकर्जुने गावात आता जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके व युवा नेते अंकुश शेळके हे राजकीय वारसा चालवीत आहेत. गेल्या ६५ वर्षांपासून या गावात शेळके यांच्या ताब्यात सत्ता आहे. त्याला मागील वर्षी ब्रेक मिळाला. यावर्षीही या गावात शेळके यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. टाकळी काझी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या ताब्यात गेल्या ४५ वर्षांपासून गावाची एकहाती सत्ता आहे. आता त्यांच्या गावात शिवसनेने कडवे आव्हान उभे केले आहे. या ठिकाणी म्हस्के परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुंडेगाव येथे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या ताब्यात गेल्या २० वर्षांपासून गावाची सत्ता आहे. गावाची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यानाही मोठा संघर्ष करावा लागत आहे.
निंबळक येथे गेल्या १५ वर्षांपासून लामखडे गटाकडे सत्तेच्या चाव्या आहेत. त्यापूर्वी या गावाची सत्ता कोतकर गटाच्या ताब्यात होती. या वर्षीही लामखडे आणि कोतकर गटात मोठी चुरस होत आहे. माजी सभापती रामदास भोर यांचे भोरवाडी गावात गेल्या २० वर्षांपसून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांच्याही विरोधात मोठे आव्हान उभे राहिले आहे. जेऊर गावाची सत्ता गेल्या १५ वर्षांपासून कर्डिले गटाच्या ताब्यात आहे. ही सत्ता अबाधित राहावी, यासाठी कर्डिले यांनी जोर लावला आहे. मात्र, तेथे महाविकास आघाडीने मोठी चुरस तयार केली आहे.