कोपरगाव : येथील आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी प्रकाश त्रिंबक कोपरे यांचे नुकतेच निधन झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोपरगाव येथे येऊन स्व. कोपरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच आंबेडकर वसतिगृहात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली वाहिली.
आठवले म्हणाले, आरपीआयच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी वेगवेगळ्या विषयावर आंदोलने, मोर्चे, उपोषणे करण्यात आली. या प्रत्येक आंदोलनासाठी स्व. प्रकाश कोपरे यांचा मोठा पुढाकार होता. अत्यंत अभ्यासू, उत्कृष्ट वक्ता, कुशल संघटक अशी कोपरे यांची ओळख होती. स्वतःच्या कुटुंबीयांची पर्वा न करता पक्ष हेच आपले कुटुंब यानुसार त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले होते. कोपरे यांच्या जाण्याने पक्षात कधीही भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच कोपरे कुटुंबीयांसह व्यक्तीशः माझ्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या कुटुंबीयांची जबाबदारी ही आपल्यावर आली आहे. यावेळी मंत्री आठवले यांनी कोपरे कुटुंबीयांना पक्षाकडून एक लाखाची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. तसेच स्व. कोपरे यांचा मुलगा स्वप्नील व मुलींना नोकरी मिळवून देण्याचे तसेच राहण्यासाठी घर बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विविध मान्यवरांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी संपूर्ण कोपरे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह आरपीआयचे राज्य, जिल्हा व कोपरगाव तालुका पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............
फोटो१४ आठवले - कोपरगाव
140221\img-20210214-wa0073.jpg
कोपरगाव येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोपरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.