शेवगाव : ऊर्जामंत्री व महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन शेवगाव मनसेच्यावतीने पोलिसांना देण्यात आले.
तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरिक्षक सुजित ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
महावितरणने कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना भरमसाठ बिल पाठवले. लॉकडाऊन दरम्यान लोकांच्या हाताला काम नसल्याने तसेच उत्पन्नाचे साधन नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढावली होती. अशा परिस्थितीत नागरिकांना मोठ्या रकमेची बिले आली. या संदर्भात वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन जनतेला दिलासा देण्याची मागणी केली होती.
याची दखल घेऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीवेळी जनतेला वीज बिलामध्ये सवलत देऊन गोड बातमी देऊ, असे आश्वासन वेळोवेळी दिले होते. त्यामुळे नागरिकांनी वीजबिल भरले नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री व वीज वितरणचे अधिकारी यांनी नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी रामेश्वर बलिया, ग्रा. पं. सदस्य दिलीप सुपारे, शिवाजी डहाळे, संजय वणवे, गणेश डोमकावळे, संजय वेताळ, देविदास हुशार, सुनील काथवटे, विनोद ठाणगे पाटील, बाळा वाघ, अशोक भागवत, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर कुसळकर, संदीप देशमुख, मंगेश लोंढे, विठ्ठल दुधाळ आदी उपस्थित होते.