अपेक्षेप्रमाणे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.
मंत्री गडाख यांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईमध्ये गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पॅनलने १७ पैकी १६ जागेवर विजय मिळविला. तर माजी खासदार तुकाराम गडाख गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाने यांनी आपल्या होमग्राउंडवरील देवगाव ग्रामपंचायतीमध्ये आपले वर्चस्व कायम राखत १३ पैकी ११ जागा मिळविल्या. तर कुकाणा येथे दहा वर्षांनी सत्तापरिवर्तन होऊन माजी आमदार पांडुरंग अभंग गटाने आठ विजय मिळवत सत्ता काबीज केली.
बेलपिंपळगाव येथे शंकरराव गडाख मित्र मंडळाने पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर व माजी सरपंच बाळासाहेब तऱ्हाळ यांच्या नेतृत्वाखाली ११ जागेवर विजय संपादन केला. भेंडा येथे घुले मानणाऱ्या नागेबाबा पॅनल विजयी झाला. १७ पैकी १६ जागेवर विजय संपादन केला. या ठिकाणी लता येडूभाऊ सोनवणे या अपक्ष म्हणून निवडणून आल्या. तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये मंत्री गडाख यांच्या दोन गटांमध्ये लढत पहायला मिळाली.
नेवासा तालुक्यात ५९ पैकी सात ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या ५२ ग्रामपंचायतीच्या ४६७ सदस्यांच्या पदासाठी १०१९ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी आठ वाजेपासून नेवासा फाटा येथे शासकीय गोडाउनमध्ये मतमोजणी झाली. मतमोजणी दरम्यान अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहायला मिळाल्या. निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष होत होता. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निरीक्षक नितीन मुंडावरे, निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सुराणा, प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.