अहमदनगर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन दिली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरचा काळ मला माझ्या अंतिम परीक्षेसारखा वाटला. तेच टेंशन, तेच प्रेशर मला जाणवले. सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते. कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते. अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते. कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते. भीतीसारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता. सुवर्णमध्य गाठणे कठीण होते. मानसिक, आरोग्यदृष्ट्या तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हूरहूर मनात कायम होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्याच सर्व गोष्टींचा सारासार विचार करीत आम्ही निर्णय घेतला आहे, असेही तनपुरे यांनी म्हटले आहे.
आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रानो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील. मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता एका नैसर्गिक परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे, पण कठीण नाही. पुढे येणा-या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा धडा यातून आपल्याला मिळणार आहे. चला मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ यात, असेही मंत्री तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना म्हटले आहे.