संगमनेर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत मिरवणूक काढली.जोर्वे ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी प्रेरणादिनानिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, सभापती सुनंदा जोर्वेकर, सुरेश थोरात, आर. एम. कातोरे, सरपंच रवींद्र खैरे, डॉ.सी.के.मोरे, शांताबाई खैरे, अॅड.लक्ष्मण खेमनर, के. के. थोरात, गबाजी खेमनर, संदीप नागरे उपस्थित होते.नामदार बाळासाहेब थोरात यांचे जोर्वे गावामध्ये आगमन होताच ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांची मिरवणूक निघाली. रस्त्यांच्या दुतर्फा सुवासनी त्यांना ओवाळण्यासाठी थांबल्या होत्या. अनेक लहान मुले, विद्यार्थी आनंदाने नाचत होते. अनेकांच्या दारासमोर रांगोळ्या काढलेल्या होत्या तर घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या. संपूर्ण गावांमध्ये अतिशय प्रसन्न व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हा भव्यदिव्य स्वागत समारंभ पाहून सर्वजण भारावून गेले. या कुस्ती स्पर्धांमध्ये २५० पहिलवानांनी सहभाग घेतला होता. यात युवराज चव्हाण हा कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला. प्रास्ताविक इंद्रजित थोरात यांनी केले. सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर सुरेश थोरात यांनी आभार मानले. जोर्वे गावची संस्कृती व संत सावलीतील संस्कार आपण कायम जपले असून प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी राहिलो आहे. वेगवेगळ्या पदावर काम करताना संगमनेर तालुक्यातील जनतेने केलेले भरभरून प्रेम हे कायम हृदयात आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये आनंद व समृद्धी निर्माण व्हावी यासाठीच आपण काम करत आहोत, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले.
मंत्री थोरात यांचे जोर्वे गावी जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:45 PM