अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा राम अर्जुन घोरपडे (वय २३, रा. मुंगी, ता. शेवगाव) याला विशेष जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून, अपहरण करून व अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही मुलीवर अत्याचार केला. या घटनेमध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. आरोपीचे वडील अर्जुन बन्सी घोरपडे यांनी सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचे लग्न राम याच्याशी जेजुरी येथे हार घालून करून दिले. तिचे बाळंतपण करण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील महापालिका दवाखान्यात मुलीला दाखल केले. मुलीचे वय खोटे सांगून सिझर करून बाळंतपण केले. यामध्ये तिला मुलगी झाली. या संदर्भात अल्पवयीन मुलीचे वडील यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेवगाव पोलिसांनी बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासामध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यापासून आरोपी फरार होते. या आरोपींना १८ मे रोजी अटक करण्यात आली. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास नेरकर यांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. आरोपीची डीएनए चाचणी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. आरोपी जामिनावर सुटल्यास तपासकामात अडथळे येण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश लगड यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Published: May 19, 2014 11:22 PM