शेवगाव : कष्टाची कामे करणाऱ्यांना कोरोना होत नाही,
कोरोना हा श्रीमंतांचा आजार आहे, मला काही आजार नाही तर नाहक लसीच्या माध्यमातून बाहेरचे विषाणू कशाला आपल्या शरीरात सोडून घ्यायचे, लस घेतल्याने पुन्हा प्रकृती बिघडते, जुने आजार पुन्हा वाढू शकतात, केंद्रात प्रचंड गर्दी असते, वाट पाहावी लागतेे, लस घेऊनही कोरोना होतो आहे, जेव्हा नंबर येईल तेव्हा लस घेण्यासाठी जाऊ, असे गैरसमज, काही शंकांमुळे कष्टकरी, मजूर समुदाय लसीकरणापासून दूर आहे. ग्रामीण भागात निरुत्साह तर शहरी भागात उत्साह असे कोरोना लसीकरणाबाबतचे चित्र शेवगाव शहरासह तालुक्यात आहे.
केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाइन वर्करला लस देण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक लस देण्यास तालुका आरोग्य प्रशासनाने १६ जानेवारीपासून सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात साठहून जास्त तसेच ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्यांना लस देणे सुरू झाले. ही लस टोचून घेण्यात मध्यमवर्गीय सेवानिवृत्त, नोकरदार, व्यावसायिक व सुरक्षित समाज घटकातील नागरिक पुढे सरावल्याचे दिसून येत आहे. लस घेतानाचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपत सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचे परिणामी इतरांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार होऊन इतर लोक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने तालुक्यातील शेवगाव व बोधेगाव ग्रामीण रुग्णालय व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. रविवारी (दि.२८) अखेर १२ हजार ३१ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. ८ मार्चपासून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्यापासून ६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्या समुदायातील नागरिक अजूनही निडरपणे लस घेण्यासाठी केंद्रात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाला ग्रामीण भागात, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या समुदायात लसीबाबत प्रबोधन करून जनजागृती मोहीम गतिमान करावी लागणार आहे.
--
शहरासह तालुक्यातील लसीकरण स्थिती
शेवगाव ग्रामीण रुग्णालय : एकूण ४७ सत्रांमध्ये कोविशिल्डचे ३८, तर कोव्हॅक्सिनचे ८ सत्रांत लसीकरण करण्यात आले.
कोविशिल्ड लस : पहिला डोस ३, १७९. दुसरा डोस १, १२४.
एकूण ४, ३०३ जणांनी लस टोचून घेतली. कोव्हॅक्सिन लस : पहिला डोस १, १०४. दुसरा डोस ०२. एकूण १, १०६ जणांनी लस घेतली. बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात २८ मार्चअखेर एकूण ६२२ जणांनी लस घेतली. ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात ठरवून दिलेल्या दिवशी २८ मार्चअखेर तब्बल ६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी सांगितले.
---
अफवांपासून दूर राहा...
शहरातील लसीकरण केंद्रामध्ये गरीब, कष्टकरी नागरिक बहुसंख्येने येत नसल्याच्या निरीक्षणात तथ्य आहे. अफवांपासून सावध राहून, कोरोना प्रतिबंधक लसीची वैद्यकीय माहिती जाणून घेऊन न चुकता लस घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांनी केले.