विनोद गोळेहल्ली चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मुली सर्रास कॉस्मेटीकचा वापर करतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसेही खर्च करतात. पण केवळ फेस योगा करून आपल्या सौंदर्यात भर टाकत भारताची सर्वात सुंदर स्त्रीचा असा ‘मिस इंडिया’ किताब मिळवणा-या मानसी गुलाटी या मुलींच्या योगामधील जागतिक दर्जाच्या आयकॉन बनल्या आहेत.फेसयोगावरच लक्ष केंद्रीत करीत त्यांनी देश, परदेशात योगाचे धडे दिले आहेत. त्यांचे कर्तृत्वमय जीवन खास ‘लोकमत’साठी त्यांनी उलगडले आहे.मानसी गुलाटी या राळेगणसिध्दीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी संत निळोबाराय विद्यालयातील विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. मूळच्या हैद्राबाद येथील मानसी गुलाटी यांनी वयाच्या चौथ्या वर्षीपासून योगा करण्यास प्रारंभ केला़ त्यांचे आजोबा सत्यपालसिंह यांच्याकडून त्यांनी प्रथम हे धडे घेतले. तरूणवयातही त्यांनी योगा सुरूच ठेवला़ त्यांच्या चेहºयालाच सौंदर्याची देणी लाभली असल्याने त्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी युवतींच्या सौंदर्याची परीक्षा करणा-या मिस इंडिया स्पर्धेत २०१५ मध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की मानसी यांनी स्वत: या स्पर्धेत उतरताना सौंदर्य वाढविण्यासाठी कोणतेही कॉस्मेटीक किंवा फाउंडेशन लावले नाही, तर त्यांनी लहानपणापासून कायम ठेवलेला फेसयोगावरच भर दिला. फेसयोगामध्ये कपाळ, डोळे, ओठ, गाल यांच्याबरोबरच योगामधील महाक्रिया योग करत राहील्या.योगामुळे त्यांच्या चेह-यावरील नैसर्गिक सौंदर्याला आणखी झळाळी मिळाली. मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेत त्यांना विजेतेपद मिळाले. मिस इंडियाचा मुकुटही त्यांना लाखो भारतीयांसमोर प्रदान करण्यात आला़योगा केल्याने स्वत:चे शरीरही निरोगी राहते. याशिवाय मनही प्रसन्न राहत असल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि त्यातूनच आपले चेह-याचे सौंदर्य खुलत जाते असे मानसी सांगतात.चेहरा काळा पडत जाणे, पिंपल्स येणे, कातडी निस्तेज दिसणे असे प्रकार होत राहतात़ माणसांसह प्रत्येक मुलींनी, महिलांनी आता कॉस्मेटीक वापरण्याऐवजी फेसयोगाचाच वापर करणे आवश्यक असल्याचे मानसी सांगतात. दैनंदिन जीवनातील केवळ पाच ते दहा मिनिटेच या योगासाठी लागतात मग आपण का वेळ देउ शकत नाही असा प्रश्नही मानसी यांनी केला़ योगामुळे अनेक आजारांपाासुन दूर राहण्यास मदत होते. आतापर्यंत योगावर सात ते आठ पुस्तके त्यांनी प्रकाशित केली असून योग प्रशिक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत देशासह अनेक देशांमध्येही दौरे केले असून आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.