नेवासा : तालुक्यातील पाचेगाव येथे रहात असलेली विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास पोलिसांनी लावावा, या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस स्टेशनसमोर मंगळवारी ( १ डिसेंबर) रोजी उपोषण सुरू केले आहे. सायंकाळी पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
याबाबत मुलीची आई साईनाथनगर येथील केशरबाई पवार यांनी नेवासा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून माझी मुलगी सिंधूबाई बोरसे व नातू कानिफनाथ भागवत बोरसे हे दोघे मायलेक पाचेगाव येथून बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाले की त्यांना कोणी पळवून तर नेले नाही ना? असा संशय ही वाटतो. मी तीन महिन्यापूर्वी नेवासा पोलीस स्टेशनला मुलगी व नातू बेपत्ता झाले असल्याची खबर दिली होती. याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग ही दाखल आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कुठलाच खुलासा केला नसल्याचे तसेच काहीच निष्पन्न झाले नसल्याचे उपोषणकर्त्या केशरबाई पवार यांचे म्हणणे आहे.
मुलीस तीन मुले असून त्यापैकी मधला मुलगा कानिफनाथ हा मुलगी सिंधुबाई सोबत आहे. १७ वर्षाचा शनैश्वर व दहा वर्षांची मुक्ता ही माझ्याजवळ साईनाथनगर येथे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. माझ्या बेपत्ता मुलीचा व नातवाचा तपास पोलिसांनी लावावा अन्यथा होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी शासनावर राहील, असा स्पष्ट इशारा ही निवेदनात दिला आहे.
उपोषणास बसलेल्यांमध्ये उपोषणकर्त्या केशरबाई पवार, बहिरनाथ पवार, नातू शैनैश्वर, नात मुक्ता यांचा समावेश होता.