शिर्डी : शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदोरची महिला प्रियकराबरोबर निघुन गेल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती अतिरीक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी मंगळवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत दिली.
साडे तीन वर्षापूर्वी इंदोर (मध्यप्रदेश) येथील महिला आपल्या पती व मुलांसोबत शिर्डी येथे साई दर्शनाला आली होती. दर्शनानंतर ती बाजारपेठेतून बेपत्ता झाली होती. तशी तक्रार तीच्या पतीने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस योग्य पध्दतीने करत नसल्याच्या भावनेतून तिच्या पतीने औरंगाबाद खंडपिठात याचीका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने शिर्डी पोलीस व जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले होते. तसेच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले होते. त्यानंतर गेल्या पंधरवाड्यात १७ डिसेंबर रोजी ही महिला इंदोर मध्येच सापडली. इतके दिवस ती कोठे होती याची माहिती पोलीसांनी तिच्याकडून घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली.
काळे यांनी सांगितले, ही महिला स्व:ताच शिर्डीतून कोपरगावला गेली. तेथून रेल्वेने पुण्याला प्रियकर ओमप्रकाश चंदेल याला जावून भेटली. तेथून ते दोघे मध्यप्रदेशला गेले.
हनुमान गाथा सांगणाऱ्या चंदेल याच्याशी तिचे प्रेमसंबध असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस चंदेल याच्याकडे वारंवार याबाबत विचारणा करत असल्याने आपण यात फसू असे वाटल्याने चंदेल याने तिला स्मृतीभ्रंश झाल्याचे नाटक करायला सांगीतले व तिला इंदोरला तिच्या बहिनीच्या गल्लीत आणून सोडले. यानंतर ती बहिणीला भेटली. त्यानंतर पोलिसांनी तिला शिर्डीला आणून औरंगाबाद उच्च न्यायालयासमोर हजर केले.