अहमदनगर : व्हिआरडीई संस्थेत सफाई कामगार म्हणून सोबत काम करणाऱ्या मित्रांचा पैशांसाठी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. खून करून फरार झालेल्या आरोपीला पाच तासात पोलिसांनी पैठण येथून अटक केली. राहुल भागवत निमसे (वय ३२, रा.मोहिनीनगर, केडगाव) असे मयताचे तर अमित बाबूराव खामकर (रा. केडगाव) असे आरोपीचे नाव आहे.राहुल व अमित हे अरणगाव रोडवरील व्हिआरडीई संस्थेत सफाई कामगार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून सोबत काम करत होते. अमित याला पैशाची गरज होती. राहुल याच्या बँक खात्यावर बरेच पैसे असल्याचा अमित याचा समज होता. त्याने राहुल याच्याकडून त्याच्या एटीएम कार्डचा क्रमांक माहिती करून घेतला होता. गुरूवारी रात्री राहुल कामावरून घरी आला तेव्हा ८. ५४ वाजेच्या सुमारास त्याला अमित याचा फोन आल्याने तो घराबाहेर निघून गेला. या दोघांची भेट झाली तेव्हा ते अरणगाव शिवारात गेले. तेथे अमित याने राहुल याला मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.खून केल्यानंतर अमित त्याच्या केडगाव येथील घरी आला. घरी त्याने त्याचा भाऊ गणेश खामकर याला राहुलचा खून केल्याची बाब सांगितली आणि तो घरातून निघून गेला. या घटनेची गणेश याने पोलिसांना माहिती दिली. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक तपास करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी मयत राहुल याचा भाऊ राजू निमसे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पाच तासाच्या आत आरोपी जेरबंदराहुल याचा खून केल्यानंतर अमित याने त्याचा मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेतले. केडगाव येथे घरी आल्यानंतर केलेले कृत्य त्याच्या भावाला सांगितले आणि घरातून तो बाहेर पडला. त्याने स्वत:चा व राहुल याचा मोबाईल फेकून दिला. राहुल याच्या एटीएममधून ४० हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर नवीन कपडे खरेदी केले. आणि एसटीने पैठणला पळून गेला. सहायक निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी अमित याच्या भावाकडे चौकशी केली. चौकशीत बहुतांशी बाबी समोर आल्यानंतर अमित याचा शोध घेऊन त्याला पैठण येथून अटक करण्यात आली.
पैशासाठी मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:53 PM