संगमनेर : संगमनेर तालुक्यात प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून ‘मियावाकी फॉरेस्ट’चा हाती घेतलेला उपक्रम यशस्वी झाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी एका गुंठ्यात बहुउपयोगी वृक्षांच्या ४०० रोपांचे रोपण करण्यात आले होते. या रोपांची आता झाडे झाली आहेत. हा परिसर बहरला असून, त्यापैकी काही झाडांना फळे ही लागली आहेत.
जपानमध्ये डॉ.अकिरा मियावाकी यांनी तीस ते चाळीस वर्षांपूर्वी जंगल निर्मितीचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, त्याचे संशोधक असलेल्या डॉ.मियावाकी यांच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या ‘मियावाकी’ पद्धतीचा जगभर प्रसार झाला. संगमनेर खुर्दमधील सुमेरू एज्युकेशन सोसायटीच्या श्री. श्री. रविशंकर शाळेच्या प्रांगणात इनरव्हील क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांनी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण केले होते.
एक गुंठा जागेत साधारण तीन फुटांपर्यंत जेसीबीच्या साह्याने खड्डे घेत, त्यात तुळस, आंबा, पिंपळ, चिंच, आवळा, बोर, वड, जांभूळ, कडुनिंब, पेरू, निलगिरी, अंजीर या वृक्षांच्या ३५० रोपांचे ठरावीक अंतर ठेवून रोपण केले होते. काही दिवसांनी पुन्हा ५० रोपे लावली होती. याची आता झाडे झाली असून, काही अंजीर व काही पेरूच्या झाडांना फळे लागली आहेत. बहरलेल्या हिरव्यागार झाडांमुळे येथे पक्ष्यांचा वावर वाढला आहे.
पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत ‘मियावाकी’ पद्धतीत सूर्यप्रकाश घेण्यासाठी रोपांमध्ये स्पर्धा लागते. त्यामुळे रोपे दहापट जलद वाढून रोपांचे लवकरच झाडांमध्ये रूपांतर होते. ही झाडे तीसपट अधिक दाट असतात. त्यांची मुळे जमिनीत खोलवर सरळ रुजत साधारण तीन वर्षांत सर्व झाडांची वाढ होते. ‘मियावाकी फॉरेस्ट’ पद्धतीत रोपांचे रोपण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने खड्डे घेतले. ते शेणखत, कोकोपीट, तांदळाच्या साळीचा कोंडा याने भरत त्यावर माती टाकली. मातीवर पुन्हा खत टाकले. असे एकूण तीन थर करावे लागतात. रोपांना नळीच्या साह्याने केवळ तीन वर्षे पाणी देण्याची गरज असते. वाढलेले गवत नियमितपणे काढत पाणी दिल्याने रोपांची वाढ होऊन त्यांचे रूपांतर आता हिरव्यागार दाट झाडांमध्ये झाले आहे.
-------------
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या माध्यमातून औरंगाबाद, जालना येथे ‘मियावाकी फॉरेस्ट’चा यशस्वी प्रयोग राबविला गेला. आम्हीही तो हाती घेत यशस्वी केला. १५ सप्टेंबर, २०२०ला या उपक्रमाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली होती. त्यानंतर, अनेकांनी आमच्याशी संपर्क केला. या उपक्रमाची माहिती घेतली. काहींनी संगमनेरात येऊन भेट दिली. त्यांनीही हा उपक्रम राबविला आहे.
- शिल्पा नावंदर, अध्यक्षा, इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर
-------------
अनेकांकडून उपक्रमाचे कौतुक
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा शिल्पा नावंदर, उपाध्यक्ष ज्योती कासट, सचिव सुनिता गाडे यांसह ज्योती पलोड, भावना नावंदर, सारिका कलंत्री, मेघा सोमाणी, स्वाती बाप्ते यांसह क्लबच्या सर्व ८९ सदस्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. इनरव्हील क्लबच्या जिल्हा सचिव रचना मालपाणी यांसह अनेकांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे.
........फोटो - संगमनेर