कोपरगाव : दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या उपोषणस्थळी मंगळवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सायंकाळी उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे दाखल झाल्या असताना शेतकऱ्यांच्या रोषामुळे त्यांना व्यासपीठावरुन पायउतार व्हावे लागले. तसेच त्यांना कार्यकर्त्यांनी भाषणासाठी माईक देखील वापरु दिला नाही. यावेळी काळे-कोल्हे समर्थकांची समोरासमोर घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.काळे यांचे तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी सोमवारपासून उपोषण सुरु होते. या उपोषणाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक गावातील शेतकºयांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर केला. या उपोषणाची दखल आमदार कोल्हे यांनाही घ्यावी लागली. त्या सायंकाळी उपोषणस्थळी आल्या होत्या. यावेळी अधिकारी व काळे यांच्या चर्चेत कोल्हे सहभागी झाल्या.चर्चेचा तपशील सांगण्यासाठी काळे यांनी भाषण सुरु केले. त्यानंतर प्रांताधिकारी ठाकरे यांचे भाषण झाले. त्यानंतर आमदार कोल्हे बोलण्यासाठी संधी मागत होत्या. मात्र, त्यांना माईकच देण्यात आला नाही. त्यांनी भाषण करण्यासाठी वारंवार माईक मागूनही त्यांना माईक दिला गेला नाही. उपोषणकर्त्या शेतकºयाच्या प्रचंड रोषामुळे त्यांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांत तणाव निर्माण होऊन घोषणाबाजी झाली. काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही झाली. आमदार नंतर निघून गेल्या. त्यावेळी काळे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.सायंकाळी काळे यांनी शिर्डीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा अन्यथा पुन्हा उपोषण करू, असा इशारा प्रशासनाला त्यांनी दिला. जिल्हाधिकाºयांनी वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविला असल्याचे लेखी पत्र देऊन दुष्काळ जाहीर होणार असल्याचे आश्वासन दिले. दिवाळीपर्यंत शेतकºयांना बोंडअळीचे पैसे देणार, विजेचे सुधारित वेळापत्रक तयार करणार, कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया चार नंबर साठवण तलावाच्या कामासाठी जनरल बोर्डाच्या बैठकीत १४ व्या वित्त आयोजनाचे पैसे मंजूर करून घेणार, २०१५ च्या रब्बीचे अनुदान देणार असे आश्वासन दिल्यानंतर आशुतोष काळे यांनी उपोषण सोडले. उपोषणाला बसलेल्या विष्णू शिंदे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, तालिबभाई सय्यद या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती.शेतक-यांचा लोकप्रतिनिधींवर रोषगेल्या दोन दिवसापासून कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी मी व माझे सहकारी तसेच तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव आम्ही उपोषण केले. मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात लेखी स्वरुपात दिलेल्या पत्रावरून आम्ही उपोषण सोडले आहे. आमदारांच्या नाही हे महत्वाचे. परंतु कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या नको त्या कामाचे श्रेय लाटण्याच्या सवयीप्रमाणे आमच्या उपोषणस्थळी आम्ही सोडलेल्या उपोषणाचे श्रेय घेऊ पाहणा-या आमदार स्नेहलता कोल्हे यांना आमच्या कार्यकर्त्यांनी व शेतक-यांनी त्यांना त्याची जागा दाखवून देत उपोषणस्थळावरुन पायउतार होऊन निघून जावे लागल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले.चैताली काळे आक्रमककार्यकर्त्यांचे व शेतक-यांचे आभार मानताना आशुतोष काळे व चैताली काळे भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. यानंतर आपल्या खास आक्रमक शैलीत चैताली काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.मी लोकप्रतिनिधी म्हणून सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. तालुक्याच्या दुष्काळाच्या संदर्भात महिन्यापासून मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांंना मीच उपोषणस्थळी पाठविले होते. दुष्काळापेक्षा विरोधकांनी उपोषणाच्या व्यासपीठावरून लोकप्रतिनिधीच्या विरोधात राजकारणच जास्त केले. एका लोकप्रतिनिधीला आपले म्हणणे मांडू न देणे हे राजकीय अपरिपक्वतेचेच लक्षण आहे. - स्नेहलता कोल्हे, आमदार.
आमदार कोल्हेंना बोलण्यापासून रोखले : कोपरगावात उपोषणस्थळी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:58 AM