श्रीरामपूर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी एकत्रित जलजीवन मिशनच्या योजनांची पुरती वाट लावली. सरपंचांच्या खोट्या सह्या घेऊन थातूरमातूर चाचण्या उरकून योजना गावांच्या माथी मारल्या. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही गावे तहानलेली राहिली, अशी टीका काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली.
संपूर्ण जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांवरून मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होऊनही गावांची तहान भागेल अशी स्थिती नाही. श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील टाकळीमिया, कारेगाव व इतर अनेक योजनांवरून आंदोलने, उपोषणे झाली. त्याची दखल घेत आमदार कानडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामांचे अधिवेशनात वाभाडे काढले.
कानडे म्हणाले, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी एकत्रित येत एकाच ठेकेदाराला आठ-दहा गावांतील योजनांची कामे दिली. गरीब सरपंचांच्या खोट्या सह्या घेऊन योजना ग्रामपंचायतींच्या माथी मारण्यात आल्या. पाण्याचा उद्भव, साठवणूक व वितरण या कामांच्या सर्व टप्प्यांवर गावातील लोकांचा कोणताही सहभाग घेतला गेला नाही. अंदाजपत्रकांप्रमाणे कामे करण्यात आली नाहीत. स्वतंत्र एजन्सी नियुक्त करून अंदाजपत्रके बनविण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की अनेक योजना अपूर्ण राहून गावांना पाणी मिळाले नाही. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या १५ हजार लोकवस्तीच्या गावात ११ कोटी रुपये खर्चाचे पाणी योजनेचे काम झाले. अत्यंत खोट्या पद्धतीने चाचणी घेऊन योजना ताब्यात देण्यात आली. सरकारने आताच तातडीने हस्तक्षेपाद्वारे अंदाजपत्रकांप्रमाणे योजना पूर्ण करून घ्याव्यात. स्वतंत्र शासन निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे कानडे म्हणाले.