अहमदनगर - नगर-पाथर्डी, नगर-कोपरगाव या महामार्गांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांचे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु होते. शनिवारी (दि.१०) राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर लंके यांनी आमरण उपोषण मागे घेतले.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी ७ डिसेंबरपासून आमदार निलेश लंके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. शनिवारी पवार यांनी लंके यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रकल्प संचालक वाबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, हे सर्व प्रश्न केंद्र सरकारच्या संबंधित आहेत. पूर्वीच्या ठेकेदाराने काम केले नाही. त्यामुळे जनतेतून उद्रेक झाला. आंदोलने झाली. आता निलेश लंके यांनीही उपोषण सुरु केले. मी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना येथील रस्त्यांची सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर गडकरी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच निलेश लंके यांच्याशीही गडकरी यांनी संवाद साधून नगर-पाथर्डी रस्त्याचे काम मार्च 2023 पर्यंत तर कोपरगाव ते विळदघाट या रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच या रस्त्यांच्या कामासंबंधी आढावा घेण्याची हमी गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत राष्ट्री महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी निलेश लंके यांना लेखी दिले आहे. पाथर्डी रस्त्याच्या कामासाठी मशिनरी लावली आहे. अधिक मशिनरी वाढवण्याची सूचना केली आहे. आता लंके यांनी उपोषण सोडावे, असे पवार म्हणाले. त्यानंतर लंके यांना लिंबू देऊन त्यांचे उपोषण सोडण्यात आले.