अहमदनगर - पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. याप्रकरणी तोडफोडप्रकणातील अन्य १७ आरोपींच्या पोलीस कोठडीतही एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
तोडफोडप्रकरणी कर्डिले यांना सोमवारी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवारी कर्डिले यांच्याविरोधात भा.द.वि.३०८ हे कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वाढविण्यात आले होते. त्यामुळे कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत १२ एप्रिलपर्यत न्यायालयाने वाढ केली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. आज न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची १३ एप्रिलपर्यत वाढ केली आहे. आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कायार्लायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.