अहमदनगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले, त्यांनाच विसरले'; अशी चपराक राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घेतला समाचार अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकपाल निर्णयावरुन जोरदार हल्लाबोल चढवला. राज ठाकरे म्हणाले की, ''या नालायकांसाठी अण्णा जिवाची बाजी लावू नका. ही अत्यंत खोटारडी, ढोंगी माणसं आहेत. नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका. केवळ अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच मोदी आणि त्यांचे सहकारी आज सत्तेवर बसले आहेत.
केजरीवाल यांच्यावरही साधलं शरसंधान आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरेंनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''आज खरंतर केजरीवाल यांनी येथे यायला हवं होतं. केवळ अण्णांमुळे दिल्लीतील सत्तेवर तुम्ही बसले आहात. नाहीतर कोण केजरीवाल? कोणी ओळखत होतं का?. ही सगळी कृतघ्न माणसं आहेत.
...गाडून टाकू या सर्वांना - राज ठाकरेयावेळेस राज ठाकरे यांनी अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की,'' अण्णा तुम्ही कुठे जिवाची बाजी लावताय. या उपोषण सोडा, आपण बाहेर पडू...गाडून टाकून या सर्वांना.यावेळेस राज ठाकरेंनी 2013मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लोकपालसंदर्भात केलेल्या ट्विटचाही दाखल दिला.
''लोकपाल बिल पास झाले पाहिजे, आमचा त्याला पाठिंबा आहे, अशा आशयाचे याच नरेंद्र मोदींचे 18 डिसेंबर 2013चे ट्विट आहे. आज पाच वर्ष झाली, पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. या लोकपालासाठी काँग्रेसला शिव्या घालणारे हे भाजपावाले... हे मोदी... आज काय करताहेत?. म्हणून मी अण्णांना एवढंच सांगितलं अण्णा फार ताणून नका'', असे म्हणत राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले आहेत.