पक्षादेश धुडकावला: पद रद्दसाठी प्रयत्न
अहमदनगर : महापौर निवडणुकीत पक्षादेश पायदळी तुडविणार्या चारही नगरसेवकांच्या पदावर टाच येण्याची शक्यता आहे. मनसेचे गटनेते गणेश भोसले यांच्यासह किशोर डागवाले, विणा बोज्जा, सुवर्णा जाधव आणि स्वीकृत नगरसेवक कैलास गिरवले या पाच नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांचे पक्षाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक वगळता इतर चौघांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांना पक्षाच्या वतीने पत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत मनसेचे पाच नगरसेवक होते. त्यापैकी कैलास गिरवले स्वीकृत असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. मागील महापौर निवडीत मनसेने विकासाच्या मुद्यावर आघाडीला पाठिंबा दिला. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी राजीनामा दिल्याने महापौर पदाची निवडणूक जाहीर झाली. महापौर पदासाठी सोमवारी जिल्हा नियोजन भवनात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी युतीचे नगरसेवक सचिन जाधव यांच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र सभागृहात मनसेच्या चारही नगरसेवकांनी पक्षादेश न पाळता आघाडीच्या बाजूने मतदान केले. सभागृहात पक्षादेश न पाळल्याने नगरसेवक भोसले, डागवाले, बोज्जा आणि जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेश सावंत यांनी जारी केले आहेत. याशिवाय पक्षविरोधी कारवाया केल्याने गिरवले यांना पक्षातून डिच्चू देण्यात आल्याचे डफळ म्हणाले. पक्षादेश न मिळाल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता नगरसेवक दिशाभूल करत आहेत. त्यांना पक्षादेश पोहोचला आहे आणि तोही वेळेत दिला गेला. एवढेच नव्हे तर पक्षादेश त्यांच्या घरावर डकवण्यात आला. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच तातडीने हा निर्णय घेतला असून, त्याची प्रत ईमेलव्दारे पक्ष कार्यालयास प्राप्त झाली आहे. शहराध्यक्ष गिरीष जाधव, नितीन भुतारे, सुमित वर्मा आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगरसेवक दावणीला
■ मागील निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्याने आघाडीला पाठिंबा दिला. परंतु, यावेळी युतीच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश पक्षाने दिले. पण नगरसेवकांनी पक्षाचा आदेश न पाळता आघाडीच्या बाजूने मतदान केले. मनसेचे हे चारही नगरसेवक आ. जगताप यांच्या दावणीला बांधलेले असल्याची टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी यावेळी केली.