पाथर्डी : शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष पदाच्या नियुक्त्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नसल्याने पक्षाचे सरचिटणीस तथा नगर जिल्हा पक्ष निरीक्षक राजा चौगुले यांनी त्या अवैध ठरविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांना विविध पदावरील नियुक्तीचे पत्र दिले होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांना विचारात न घेता या नियुक्त्या झाल्याने पक्षांतर्गत नाराजी होती. त्यामुळे जिरेसाळ यांच्या गटाने पक्षश्रेष्ठेंकडे तक्रारी केल्या होत्या. पक्ष निरीक्षक चौगुले यांनी १६ डिसेंबर रोजी एका पत्रकान्वये जिल्हाध्यक्ष खेडकर यांनी केलेल्या सर्व नियुक्त्या अवैध ठरविल्या आहेत.तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची नियुक्ती, मुदतवाढ तसेच तालुका कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार फक्त पक्षप्रमुख ं्नराज ठाकरे यांना आहेत व नियुक्तीपत्र ठाकरे यांच्या अधिकृत लेटर हेडवर त्यांच्या सहीने दिले जातात. त्यांच्या शिवाय नियुक्तीचे अधिकार इतर कुणालाही नाहीत. त्यामुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील इतर कुणीही मनसे पदाधिका-यांच्या नेमणुका, मुदतवाढ, तालुका कार्यकारिणी जाहीर करणे ही बाब पूर्णपणे अवैध असून पक्षाच्या नियमांविरोधात आहे. परस्पर असे अवैध नियुक्ती करून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. अशा प्रकारची कृती केल्यास पक्षाच्यावतीने संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पक्षनिरीक्षक चौगुले यांनी पत्रकात स्पष्ट म्हटले आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी स्वत:च्या अधिकारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न विचारताच पक्ष नियमांचे उल्लंघन करून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी जाहीर केलेली तालुका कार्यकारिणी ठाकरे यांच्या आदेशानुसार रद्द केली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात येईल.-राजा चौगुले, मनसे, पक्षनिरीक्षक
मी जाहीर केलेली कार्यकारिणी अधिकृत असून वर्षापूर्वी राजा चौगुले यांना पक्षाने नगर जिल्ह्याचे काम थांबविण्याचे सांगितले आहे. सध्या राज ठाकरे परदेशात असल्याने आम्हाला वाद वाढवायचा नाही. चौगुले काल शिवसेनेतून मनसेत आले. आमचे आयुष्य राज ठाकरे यांच्या सोबत गेले आहे. चौगुले यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी.-देविदास खेडकर, मनसे जिल्हाध्यक्ष