अहमदनगर : हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होत आहे. हिवरेबाजारमध्ये राबविलेले कोरोनामुक्तीचे प्रयोग आता संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन भवनातून राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ग्रामस्तरावरील अधिकारी, सरपंच यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. आता हिवरेबाजारचा हाच पॉटर्न जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांची चाचणी करणे, इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करणे यास प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात संवाद साधला. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार हेही यावेळी उपस्थित होते. जिल्हास्तरावरून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके सहभागी झाले होते. तालुकास्तरावरून संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.
---------
काय केल्या सूचना
एकत्रित काम करण्याची गरज
प्राथमिक पातळीवरच सर्वेक्षणाचा वेग वाढवणे
बाधितांना शोधण्याची मोहीम गतिमान करणे
दुकाने, बँका आदी ठिकाणी गर्दी टाळणे
गट-तट न पाहता सरपंचांचा सहभाग
गतवर्षी गावपातळीवर केलेल्या उपायांची अंमलबजावणी
-------------
काय आहे हिवरेबाजार मॉडेल १) बाहेरच्या गावातून / जिल्ह्यातून येणाऱ्यांची चाचणी करा. बाहेरून आलेल्या मजुरांना शेतातच रहायला जागा द्या. त्यांची चाचणी करून त्यांना शेतातच राहू द्या
२) कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत नागरिकांना विलगीकरणातच ठेवा.
३) ग्राम सुरक्षा समिती किंवा गावात स्वयंसेवकाची पथके तयार करून कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजना सुरू आहेत का, नागरिक नियम पाळतात का, याची वारंवार पाहणी करा.
४) दर आठवड्याला तापमानाची तपासणी करा व ऑक्सिजनची पातळी मोजा आणि महत्त्वाचे म्हणजे लस घ्या.
५) संशयित कोणी आढळून आल्यास लगेच कोरोना चाचणी करा. पाॅझिटिव्ह असूनही लक्षणे नसतील तर गावातील शाळेत / शेतात / घरात विलगीकरणातच रहा. इतरांच्या संपर्कात येऊ नका.
६) कोरोना बाधित असाल आणि लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार करा.
७) कोरोनाचे संकट कमी होईपर्यंत मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या नियमांचे पालन काटेकोरपणे करा. घाबरू नका पण काळजी घ्या
-------------------
फोटो- १३ पोपटराव पवार
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी ग्रामस्तरावरील अधिकारी, सरपंच यांच्याशी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला