अहमदनगर : मोदी सरकार-२ च्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणा-या अभियानासाठी आजी-माजी आमदार, खासदारांची संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नेते त्यांच्या मतदारसंघात पुढील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने सर्वच मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख नेते सिक्रीनवर झळकणार असल्याची चर्चा आहे.
भाजपचे हे अभियान जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात राबविणार आहे. विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले संयोजक व पक्षाचे पदाधिकारी सभा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तसा कार्यक्रमच प्रदेशकडून जिल्ह्यातील नेत्यांना आला आहे. सभेसाठी ७ ते १२ जून हा कालावधी आहे. अद्याप एकाही मतदारसंघात सभा झालेली नाही. या सभा आता पुढील आठवड्यात होतील. या डिजीटल सभेची तयारी नेत्यांकडून सुरू आहे.
शहर विधानसभा मतदारसंघासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हे संयोजक आहेत. शिर्डी-माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे, कोपरगाव-माजी आमदार स्रेहलता कोल्हे, श्रीरामपूर-राजेंद्र गोंदकर, नेवासा- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-आमदार मोनिका राजळे, राहुरी-माजी आमदार शिवाजी कर्डिले, पारनेर-खासदार डॉ़सुजय विखे, श्रीगोंदा-आमदार बबनराव पाचपुते, कर्जत-जामखेड माजीमंत्री राम शिंदे हे सभा घेणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात हे नेते सभा घेणार असून, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.