गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी; पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी शेतकरीविरोधी कायदे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 06:24 PM2020-10-15T18:24:49+5:302020-10-15T18:25:39+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला आहे.
अहमदनगर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला आहे. ते सातत्याने देशाशी खोटे बोलत आहेत. ते सांगतात, 'मै देश नही बिकने दूँगा.' मात्र, मोदींनी सरकारी कंपन्या, रेल्वे विक्रीस काढली आहे. हा देशाशी धोका आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
महाराष्ट्रातून १ करोड शेतकऱ्यांच्या सह्या या शेतकरी, कामगार कायद्याविरोधात घेतल्या जाणार आहेत व केंद्र सरकारला हे काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मोदी हे केवळ खोटे बाेलून देशाची दिशाभूल करीत आहेत. पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले. किती जणांच्या खात्यावर पंधरा लाख आले. २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मग तरुण बेरोजगार का झाले? देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. देशाची अर्थ व्यवस्था रसातळाला गेली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर खटले भरले जात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या राहूल गांधी, प्रियंका गांधी यांनाही अडवणूक धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत. ही एकप्रकारची हुकुमशाही असल्याचे पाटील यांनी सांगितले.