तिसगाव : केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रूरबन योजनेचा मूळ मंजूर आराखडा ऑनलाईन प्रक्रिया करताना समावेश असणाऱ्या गावांना विश्वासात न घेताच त्यामध्ये फेरबदल केले. त्यातील काही विकासकामे वगळण्यात आली. काही गावांच्या कामांचा निधी कमी करण्यात आला, अशा लेखी तक्रारी सुरू काहींनी केल्या आहेत. पाथर्डी तालुका पंचायत समिती प्रशासन याबाबत काय उत्तर देते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी (दि. ३०) विविध गावांतील पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन करून जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. परिसरात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना ग्रामपंचायत सदस्य आसाराम ससे म्हणाले, केंद्र शासनाच्या रूरबन योजनेत तिसगावसह परिसरातील निवडुंगे, पारेवाडी, श्रीक्षेत्र मढी, शिरापूर, कासारपिंपळगाव, सोमठाणे, देवराई, मांडवे, कौडगाव, आदी गावांची निवड झाली. या गावांचे विकास आराखडे झाले. कार्यालयीन आदेश निघून कामेही सुरू झाली. परंतु, हेच मूळ आराखडे ऑनलाईन प्रक्रिया करताना फेरबदल करून निधी कमी करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉकची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविली होती. ऑनलाईन आराखड्यांचे अवलोकन करताना मात्र ही कामे दिसतच नाहीत. शालेय साहित्य खरेदीच्या यादीतही फेरबदल झालेत, असे कागदपत्रांच्या पडताळणीतून नजरेस आल्याचे ससे यांनी सांगितले.
तिसगावचे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनीही अशाच आशयाची लेखी तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. कौडगावच्या सरपंच मंगल म्हस्के, शिरापूरचे उपसरपंच नितीन लोमटे यांनीही ‘लोकमत’शी बोलताना याबाबत जाहीर नाराजी नोंदविली.
--
तक्रारींचे लेखी निवेदन कार्यालयास प्राप्त झाले आहे. तक्रारींची पडताळणी सुरू आहे.
- शीतल खिंडे
गटविकास अधिकारी, पाथर्डी