विनोद गोळेपारनेर : लोकपाल व शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी साडेतीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४३ पत्रे पाठवली. त्यातील एकाचेही उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायरीवर डोके टेकवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प केला होता. आता त्यांनीच आपल्या हुकूमशाहीतून देशाची पवित्र लोकशाही संकटात आणली आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘लोकमत’ने अण्णांशी संवाद साधला.दिल्लीत आंदोलनास चार महिन्यापासून जागा मागतोय, दिली नाही. सत्तेची मस्ती आल्याने हुकूमशाहीतून मला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याकडून ८० व्या वर्षीही त्रास दिला जातोय, पण जनसेवेसाठी त्रास सहन करून पंतप्रधान यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करणार आहे. आपण नेहमी जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आहोत. मी जनसेवक व पंतप्रधान मोदी सुध्दा जनसेवक आहेत. तरीपण त्यांनी पत्रांना उत्तरे का दिली नाही ते समजत नाही. बहुतेक सत्तेत आल्यावर काहींना सत्तेची मस्ती येते. तशी सत्तेची नशा येऊन त्यांना मस्ती आली असेल, असे अण्णा म्हणाले.
मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का?
लोकपालसाठी विरोधी पक्षनेते नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यात वेळकाढूपणा सरकारने केला. पण किमान भाजपचे मुख्यमंत्री असणाऱ्या राज्यांमध्ये लोकायुक्त का नेमले गेले नाहीत. मग अनेक राज्यांमध्ये असणारे भाजपचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का? असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला.
देशातील शेतकरी संघटनांनी एकत्र यावे
देशभरात शेतक-यांच्या मोठ्या समस्या आहेत. शेतक-यांना पेन्शन मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा व स्वामिनाथन आयोग लागू करावा ह्या सुध्दा आपल्या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत. देशभरात केलेल्या दौ-यात मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटना सहभागी झाल्या होत्या. आता महाराष्ट्रासह देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णांनी केले.
वृत्तपत्रांनी साथ दिली
देशभरात गेली दोन महिने जम्मू काश्मीरसह देशभरात प्रत्येक राज्यात सभा घेतल्या. त्यावेळी लोकांचा प्रतिसाद मोठा होता पण सभेस असणारे शेकडो वृत्तवाहिन्यांची गर्दी प्रत्यक्षात काहीच दाखवत नसल्याचे कार्यकर्ते म्हणत होते. मग ही मीडियाची गर्दी कुठे गेली. वर्तमानपत्र यांनी मोठी साथ सभांना दिल्याचेही अण्णांनी सांगितले.
कार्यकर्त्यांसह जेलभरो सत्याग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर व खासदारांच्या घरासमोर आम्ही व कार्यकर्ते भजन, कीर्तनासह आंदोलन करणार आहोत. सत्याग्रह सुरू केल्यावरच सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल यातूनच आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत असे अण्णांनी सांगितले.