अकोले : शहरात अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढत चालला आहे. या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावा घेतला आहे. यामुळे आबालवृद्धांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोले नगरपंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
अकोले शहरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट अचानकपणे वाढला आहे. मध्यंतरी संगमनेर नगरपालिका क्षेत्रातील पकडलेली मोकाट कुत्री जंगलात सोडण्याच्या नावाखाली एका टेम्पोत भरून अकोले तालुक्यात पाठविली गेली. संबंधित टेम्पोचालक तालुक्यातील कळस, कुंभेफळ, रेडे परिसरात काही कुत्री सोडत असताना कार्यकर्ते व नागरिकांना आढळून आला. यावेळी जागृत कार्यकर्त्यांनी हा टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. मात्र, नेहमीप्रमाणे जुजबी कारवाई करून टेम्पो व चालकास सोडून देण्यात आले होते. त्यानंतर नगरपंचायतीने शहरातील कुत्री पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली; पण यात काही खासगी कुत्री पकडल्या गेल्यामुळे कुरबुरी झाल्या होत्या. तेव्हा काही भागांतील मोकाट कुत्री अकोलेतून गायब झाली होती. त्यामुळे आबालवृद्धांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, त्यावेळी शहरातील कोल्हार घोटी रस्ता, महालक्ष्मी, दुधगंगा कॉलनी, शेकईवाडी परिसरातील कुत्री पकडली गेली नव्हती.
गेल्या आठवडाभरापासून पुन्हा शहरातील विविध भागांत कुत्र्यांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे. एक नव्हे, तर सात ते आठ कुत्र्यांचा घोळका रस्त्यावरून फिरत असतो. बाहेरून ही कुत्री अकोले शहरात आणून सोडली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातील काही कुत्री ही पिसाळलली आहेत. ती माणसांबरोबरच स्थानिक कुत्र्यांवर हल्ले चढवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
....
महालक्ष्मी काॅलनीसह शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. एकत्र टोळीने कुत्र्यांच्या झुंडी फिरतात. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
-पुष्पाताई वाणी, ज्येष्ठ नागरिक, महालक्ष्मी काॅलनी, अकोले
...
नगरपंचायतीने आतापर्यंत तीन वेळा मोकाट कुत्री पकडून जंगलात सोडली. शिर्डी, कोपरगाव, संगमनेर भागांत कुत्री पकडून अकोले तालुक्यातील विठा- वाशेरे- शेरणखेल घाटात सोडली जातात. ही कुत्री टोळीने शहरात वास्तव्यास येतात. नागरिकांच्या मागणीनुसार मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू.
-विक्रम जगदाळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, अकोले
...
फोटो-२८अकोले कुत्रे
..
अकोले शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. टोळीने ही कुत्री रस्त्यावर फिरून नागरिकांत दहशत पसरवीत आहेत.