राजूर : येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी याच शाळेतील अधीक्षकास पोलिसांनी गुरुवारी अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत ८ वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीस अधीक्षक सुरेश तायडे याने २२ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यानंतर सफरचंद काढण्याचा बहाणा करीत खाली बोलवले व तिला एकटीला धान्य साठविण्याच्या कोठीमध्ये नेले. विनयभंग केल्याने मुलीने तेथून पळ काढला.दुसऱ्या दिवशी सुटी असल्यामुळे संबंधित विद्यार्थिनी घरी निघून गेली. मात्र तिने घडलेला प्रकार घरी कुणालाही सांगितला नाही. वसतिगृहात आल्यानंतर मुलीने सर्व घटना आपल्या मामास सांगितली. मामा गुरूवारी चौकशीसाठी आला. याबाबत तक्रार करण्यासाठी प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटले व त्यांना सदर घटना सांगितली. यावेळी कार्यालयाबाहेर आलेल्या अधीक्षक तायडेस जमलेल्या संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला.ही घटना पोलीस स्टेशनला समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पाटील यांनी या अधीक्षकास ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबावरून आरोपी तायडेवर विनयभंग व अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
विद्यार्थिनीचा विनयभंग
By admin | Published: September 18, 2014 11:07 PM