अहमदनगर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे बँकांनी परस्पर काढून घेतल्याचे उघड झाले आहे. तालुकास्तरीय यंत्रणेने घोळ केला असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढून घेण्याचा अधिकार बँकांना कोणी दिला?, असा सवाल प्रा. बेरड यांनी केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यात १९३ कोटी रुपयांचा प्राथमिक घोटाळा उघडकीस आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात वेगळाच घोळ समोर आला आहे. जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय समितीने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची ग्रामस्तरीय समिती शासनाने निर्माण केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.