केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथे नगर - औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
जेऊर परिसरात काही दिवसांपूर्वी वानरांचा एक कळप आलेला आहे. वानरांच्या मर्कटलीला ग्रामस्थांसह चिमुकल्यांना सवयीच्या झाल्या आहेत. नगर - औरंगाबाद महामार्गावर सीना नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
मृत वानराचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी केले. वानराचा अंत्यविधी वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक श्रीराम जगताप, वन कर्मचारी तुकाराम तवले, संजय सरोदे, संजय पालवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जेऊर परिसर वानरांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात महावितरण कंपनीच्या परिसरात विजेचा शॉक बसून वानराचा मृत्यू झाला होता. कदम गल्लीत झाडावरून पडल्याने वानराचा मृत्यू झाला होता. आता अपघातात वानराचा मृत्यू झाल्याने दोन महिन्यांत तीन वानरांचा मृत्यू झाल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत.