केडगाव : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील वाकळी रोडची वस्ती गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वस्तीवर येणारी सिंगल फेज लाईन कट केली आहे. दरम्यान, याच परिसरात तीनवेळा बिबट्याने दर्शन दिले असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीज पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी वाळकी रस्त्यावरील ग्रामस्थांनी बाबुर्डी बेंद येथील सबस्टेशनवर शुक्रवारी मोर्चा काढला.
बाबुर्डी बेंद परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिंगल फेज लाईनचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यातच वाळकी रोड वस्तीवरील सिंगल फेज लाईन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कट केली आहे. त्यामुळे या परिसरात अंधार आहे. तसेच या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे. तसेच या भागात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरगुती वीज पूर्वीप्रमाणे सुरळीत करा या मागणीसाठी सबस्टेशनवर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी खंडेश्वर सहकार संस्थेचे उपाध्यक्ष लहू कासार, शिवाजी चोेभे, बाळासाहेब चोभे, सुनील साळवे, शरद चोभे, काळूभाऊ साळवे, अनिल चोभे, महादेव चोभे, बंडू चोभे, पप्पू चोभे, हरि चोभे, चित्रा चोभे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
फोटो : ०८ बाबुर्डी
वीज पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी वाळकी रस्त्यावरील ग्रामस्थांनी बाबुर्डी बेंद येथील सबस्टेशनवर मोर्चा काढला.