------------
लोकमत न्यूज नेटवर्क
सुदाम देशमुख
अहमदनगर : नवीन दुकान मंजुरीवरील स्थगिती राज्य शासनाने उठविल्यामुळे जिल्ह्यात जवळपास दीडशेपेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकानांची (रेशन दुकाने) संख्या वाढणार आहे. सध्या पुरवठा विभागाकडे अर्ज प्राप्त होत असून, छाननीनंतरच प्रत्यक्ष नवीन किती दुकाने सुरू होणार आहेत, याची संख्या निश्चित होणार आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत, राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर, २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १६१ रेशन दुकानांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात शहर आणि ग्रामीण भागातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण १,८८४ इतकी स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी ९१ दुकाने अहमदनगर शहर म्हणजे महापालिका हद्दीत आहेत. अनेक वर्षांपासून नवीन रेशन दुकानांना परवानगी दिलेली नव्हती. ती परवानगी आता मिळाली आहे. या संदर्भात प्रत्येक तालुका स्तरावर किती नवीन दुकानांची गरज आहे, या संदर्भात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव आल्यानंतरच जिल्ह्यात किती रेशन दुकाने आणखी वाढणार आहेत, याची संख्या निश्चित कळणार आहे. जुन्या नियमानुसार विचार केला, तर संस्थेला दुकान द्यायचे असेल, तर आठ हजार इतकी लोकसंख्या विचारात घेतली जाते. वैयक्तिक दुकानासाठी सहा हजार इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्येचाच विचार केला, तर अहमदनगर शहराची लोकसंख्या वाढली आहे. ती साधारणपणे सहा लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे वैयक्तिक दुकानांचा विचार केला, तर १२० पर्यंत नगर शहरात दुकाने असण्याची गरज आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर ही लोकसंख्या ५० लाखांच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे ही संख्याही दोन ते तीन हजारांच्या पुढे असणे आवश्यक आहे. सध्या केवळ लोकसंख्या हाच एकमेव आधार आता राहिलेला नाही. पूर्वी केशरी कार्डधारकांना सरसकट धान्य दिले जात होते. आता प्राधान्य कुटुंबालाच धान्य मिळते. परिणामी, लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू करायचे असेल, तर संबंधित भागात किती लाभार्थी आहेत, याचाही विचार नवीन दुकान देताना पुरवठा विभागाला करावा लागणार आहे.
----------------
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने
एकूण दुकाने- १,८८४
नगर शहरातील दुकाने- ९१
------------
जिल्ह्यात दुकाने वाढविण्याबाबत शासनाने आदेश आलेले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध होईल. नागरिक, संस्थांचे अर्ज मिळाल्यानंतर त्याची छाननी होईल. त्यामध्ये पात्र अर्ज निश्चित झाल्यानंतरच जिल्ह्यात किती नवीन दुकाने होतील, ते सांगता येईल. पूर्वीची बंद दुकाने, काही मयत झालेले दुकानदार, कारवाई केलेल्या दुकानांची संख्या पाहता, ग्रामीण भागात १५० ते १६० नवीन दुकाने सुरू होऊ शकतात.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी.
------------------