लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेल्या लॉकडाऊन काळात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत होते. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घातले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई होत असून देखील मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नेमका हा वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर सकाळ व संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जाण्याचा सल्ला देतात. तसेच अनेकजण पहाटे लवकर उठून फिरायला जातात. गेल्या अनेक वर्षांपासून दररोज सकाळ, संध्याकाळ न चुकता फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तरुणवर्गही याकडे आकर्षित झाला आहे. ही सवय अनेकांच्या अंगवळणी पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. कोरोना नियंत्रणात नसताना नागरिक वॉकसाठी नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.
--------------
९० नागरिकांची कोरोना चाचणी
संगमनेर शहरातील प्रवरा नदीचा परिसर, नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग येथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेतही कमी झालेली दिसत नाही. फिरायला जाणारी व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असल्यास ती इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे बुधवारी (दि. १९) अचानक प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी पोलीस फौजफाट्यासह प्रवरा नदी परिसरात जात तेथे फिरायला आलेल्या नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली. ९० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
-------------
मधुमेहाचा त्रास; डॉक्टरांचा फिरण्याचा सल्ला
कोरोनाची भीती वाटते, पण फिरायला जात असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य पद्धतीने काळजी घेतो. मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी मला दरारोज फिरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, घराबाहेर पडलेल्यांवर पोलीस कारवाई करतात. मास्क लावून गर्दी न करता फिरायला जाण्यास काही हरकत नसावी, असे माझे मत आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
--------------
दारूसाठी गर्दी चालते का?
आरोग्यासाठी घातक असलेल्या दारू विक्रीला परवानगी आहे. दारू विकत घेण्यासाठी गर्दी होते ते चालते का?
परंतु आम्ही जर आमच्या आरोग्यासाठी मास्क लावत, शारीरिक अंतराचे नियम पाळून फिरायला जात असू तर कुणाची काही हरकत नसावी. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतो आहे. मात्र, आता भीतीही वाटते आहे. कुठूनही पोलीस गाडी येईल अन् कारवाई होईल. त्यामुळे आता फिरायला जायला खंड पडतो आहे, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
----------------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हवेतून देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडण्याऐवजी घरीच प्राणायाम करावा. त्याचा फायदा वॉकपेक्षाही चांगला होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करावेच लागेल. कारवाईत प्रशासनाकडून सातत्य राहील. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई होईलच. प्रशासनाला नागरिकांनी साथ द्यावी.
डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी, संगमनेर उपविभाग, संगमनेर.
---------------
‘त्या’ सर्वांना झाला आनंद
प्रवरा नदी परिसरात फिरायला आलेल्या नागरिकांवर प्रशासनाने अचानक कारवाई केली. त्यावेळी
नदीत पात्रात पोहणारे अनेकजण दुसऱ्या बाजूने पळून गेले. पोलिसांना पाहून घाट परिसरात उभ्या असलेल्या तरुणांनी आपली वाहने भरधाव नेली. काहीजण शेतात पळाले. ज्यांना पळून जाता आले नाही, ते पोलिसांच्या तावडीत सापडले. अशा नागरिकांची कोरोना चाचणी करत असताना त्यांचे चेहरे पडलेले दिसत होते. मात्र, चाचणी निगेटिव्ह आलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.