लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांत काहीचा दिलासा मिळाला आहे. काेरोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट झाली असून, गेल्या दहा दिवसांत मृतांचा अकडा निम्म्याने घटला आहे. मागील एप्रिल महिन्यात दररोज ५५ ते ६० जणांचा मृत्यू होत होता. ती संख्या आता कमी होऊन ३० ते ३२ इतकी झाली आहे.
कोरानामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील एक हजार नागरिकांना जीव गमवावा लागला. मागील एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू झाले. २७ एप्रिल रोजी एका दिवसांत ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर मात्र, मृत्युदरात घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, शहरासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले गेले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झालेली नाही, परंतु वाढही झालेली नाही. रुग्णसंख्या तीन ते साडेतीन हजारांवर स्थिरावली आहे, परंतु गेल्या दहा दिवसांत जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा मागील एप्रिल महिन्यात वाढला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. एकाच वेळी ४० ते ४५ रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूचे तांडवच सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासून मृत्यूचा आकडा कमी होऊ लागला आहे. तो एकदम कमी झाला आहे, असे नाही, परंतु त्यात काही प्रमाणात का होईना, पण घट झाली आहे. कठोर निर्बंध आणखी वाढविण्यात आल्याने मृत्युदरात आणखी घट होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
.......
गेल्या दहा दिवसांत मृत्युसंख्या
१-५ -३२
२-५-३६
३-५-३१
४-५-३८
५-५-३०
६-५-३५
७-५-३०
८-५-३४
९-५-३२
१०-५-३०
११-५- ३५
.....
- जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मागील एप्रिल महिन्यात मृत्यूचा अकडा वाढला होता. दररोज ५५ जे ६० जणांचा मृत्यू होत होतो. हा अकडा चालू महिन्यात काहीसा कमी झाला आहे. सध्या दररोज ३० ते ३२ जणांचा मृत्यू होत आहे.
- सादिक पठाण, व्यवस्थापक, अमरधाम