शिर्डी : साईबाबा समाधीसाठी दर्शनासाठी सर्वाधिक भाविकांनी शिर्डीत भेट दिल्याची नोंद जागतिक पातळीवरील इंग्लंडच्या वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् या संस्थेने नोंद घेतली आहे.सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले स्थान व सर्वाधिक धार्मिक सेवा देणा-या स्थानांच्या वर्गवारीत जागतिक स्तरावर ही नोंद करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र या संस्थेचे समन्वयक विक्रम त्रिवेदी यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुरंबीकर, उप वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे व वैद्यकीय अधिक्षिका मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल अग्रवाल यांच्या हस्ते त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.
वर्षाकाठी साडेतीन कोटी भाविक साईचरणी
शिर्डीला वर्षाकाठी तीन ते साडे तीन कोटी भाविक भेट देतात. ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास पंचवीस टक्के आहे. संस्थान प्रसादालयातसुद्धा वर्षभरात दीड कोटी भाविक प्रसाद भोजन घेतात. विशेष म्हणजे इतक्या संख्येने भाविक शिर्डीला भेट देत असले तरी शिर्डीचे भौगोलिक क्षेत्र केवळ चौदा चौरस किलोमीटर आहे. भाविकांची वर्दळ केवळ चार चौरस किलोमीटरमध्ये असते.