- बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा (अहमदनगर): ‘आई बाबा... आम्ही सुखात आहोत. आम्ही शाळेत जातो. देवाने आम्हाला दुस-या आई-बाबांकडे ठेवले आहे. ते आमची काळजी घेतात. तुम्ही आम्हाला जन्म दिला! पण, तुम्ही आमच्या चिमुकल्या पाखरांच्या पंखात बळ येण्या अगोदरच आम्हाला सोडून दिले. आम्हाला तुमची खूप आठवण येते, पण तुम्हाला आम्ही कुठे शोधू? तुम्ही तुमच्या पाखरांना भेटायला येणार ना? सांगा ना आई बाबा..!’ परभणी येथील मोतीराम वानखेडे व सोनाबाई वानखेडे यांनी चार वर्षांपूर्वी माया व कार्तिक या पोटच्या गोळ्यांना घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील महात्मा फुले आश्रमशाळेत सोडले. अन् नंतर पुन्हा या पोटच्या गोळ्यांचे काय झाले? याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमशाळेचे अध्यक्ष पोपटराव खामकर व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी या निराधार लेकरांना आई- बाबांची ऊब दिली. पण जन्मदाते आई-बाबा आपणास कधी भेटतील याची आस या चिमुकल्यांना लागली आहे. वानखेडे दांपत्य घारगावातील गंगाराम खामकर यांच्या शेतात कामाला होते. माया सहा वर्षांची व कार्तिक वर्षांचा होता. त्यांना शिक्षणासाठी महात्मा फुले आश्रमशाळेत दाखल केले. परभणीला जाऊन येतो म्हणून हे दांपत्य गेले, ते पुन्हा माघारीच आले नाही. पोपट खामकर, गंगाराम खोमणे यांनी यांनी परभणीला जाऊन रमाईनगर परिसरात मोतीराम वानखेडे यांचा सलग दोन वर्षे शोध घेतला. पण वानखेडे दांपत्य सापडले नाही. माया आता चौथीला, तर कार्तिक दुसरीला आहे.
* आम्हाला देवाने दुसरे आई बाबा दिले. पण ज्यांनी जन्म दिला, अशा आई बाबांना भेटायची इच्छा आहे. ते भेटले तर खूप आनंद होईल. - माया वानखेडे
* माया व कार्तिक ही ईश्वराने आम्हाला दिलेली भेट आहे. आई वडील त्यांना आश्रमशाळेत सोडून गेले. पुन्हा माघारीच आले नाहीत. - पोपटराव खामकर, अध्यक्ष, महात्मा फुले आश्रमशाळा