पारनेर (जि. अहमदनगर) : पत्नीला सासरी नांदायला पाठवित नसल्याच्या कारणातून वाद होऊन जावयाने सासूवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून ठार केल्याची बाब समोर आली आहे. तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी रात्री पावणेदहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सविता सुनील गायकवाड (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. राहुल गोरख साबळे (रा़ रांधे ता़ पारनेर) हा आरोपी आहे. साबळे याचा मयत सविता गायकवाड यांच्या मुलीशी दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. सहा महिने संसार केल्यानंतरदोघे वेगळे राहत होते. पत्नीला सासरी पाठवावे यासाठी साबळे हा गायकवाड कुुटुंबीयांना त्रास देत होता. याबाबत सविता गायकवाड यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. साबळे याने सोमवारी रात्री वडझिरे येथे येऊन सविता गायकवाड यांच्याशी पुन्हा वाद घातला. साबळे याने स्वत:कडील गावठी कट्ट्यातून सविता यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.मयत सविता यांनी घटनेपूर्वी दिली होती तक्रार
सविता गायकवाड यांनी आरोपी राहुल साबळे याच्याविरोधात सोमवारी दुपारी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत साबळे हा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी म्हटले होते़ पोलिसांनी मात्र या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. अखेर त्याच रात्री साबळे याने गोळ्या घालून सविता यांचा खून केला.