कोतूळ : चार वर्षांच्या मुलीला आणि दीड वर्षाच्या मुलाला जन्मदात्या आईने जंगलात सोडून दिले मात्र चार वर्षांच्या बहिणीने दीड वर्षाच्या भावाचा अडीच वर्षे सांभाळ करून तीने आईपण जोपासले. हा प्रकार अकोले तालुक्यातील कळंब या गावात घडला आहे.
अकोले तालुक्यातील कोतूळ पासून पंधरा किलोमीटर अंतरावर कळंब गाव आहे. गावाच्या पूर्वेला तीन मैलावर परतनदरा नावाचे रान, आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही. या रानात नंदिनी सोनवणे (वय ७) सिद्धांत (वय ४ ) हे बहीण -भाऊ व वडील ज्ञानदेव सोनवणे एका कांडेसाबराच्या जाळीत कागदी पालात राहतात.
नंदिनी साडेचार व सिद्धांत दीड वर्षाचा असताना त्यांची जन्मदात्री आई नवरा गरीब म्हणून घर सोडून गेली. वडील ज्ञानदेव दिवसभर गवंड्याच्या हाताखाली ओतूर, ब्राम्हणवाडा, आळेफाटा येथे जातात ते रात्री आठ नऊ वाजता घरी येतात. नंदिनीचे घर म्हणजे बाजूने फक्त काटेरी झुडपे आणि मध्ये कागदी पाल.
सिद्धांत दीड वर्षाचा असल्यापासून तो दिवसभर नंदिनी बरोबर त्या पालात राहतो. दिवसा रडू लागला तर आईसारखं कुशीत घेऊन ती थोपटते. सध्या सिद्धांत चार वर्षांचा आहे.
नंदिनी सात वर्षाची दुसरीत शिकते. अभ्यासातही हुशार आहे. वडील कामाला गेल्यावर झोपडीत आवरासावर करून ती तीन मैल पायी शाळेत जाते. सध्या सिद्धांतही बरोबर जातो. आता नंदिनी, सिद्धांतला हवा आहे मदतीचा हात तो शिक्षणासाठी.
...........
माझी पत्नी अडीच वर्षापूर्वी माझी परिस्थिती गरीब म्हणून घर सोडून निघून गेली. तेव्हा नंदिनी साडेचार तर सिद्धांत दीड वर्षाचा होता. आई नसल्याने तो बहिणीच्या कुशीत झोपायचा. आई म्हणून तिने भावाला सांभाळलं. दिवसभर मजुरी करतो यामुळे सांभाळ कसा करणार. मुलांना वसतिगृह मिळालं, शिक्षण मिळाले तर बरे होईल
- ज्ञानेश्वर सोनवणे, वडील
फोटो - कोतूळ